स्वच्छताकर्मींची काळजी घेत उन्हापासून संरक्षणासाठी टोप्यांचे वितरण 

नवी मुंबई – सध्या वातावरणातील उष्मा मोठया प्रमाणावर वाढला असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांनी कारणाशिवाय दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छतेसाठी सकाळी लवकरच बाहेर पडणाऱ्या स्वच्छताकर्मींच्या आरोग्याची काळजी घेत सर्व स्वच्छताकर्मीं व त्यांचे पर्यवेक्षक यांना घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत टोप्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत ठेवावी व नियमितपणे जास्तीत जास्त पाणी प्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व कंत्राटदारांनी आपल्या स्वच्छताकर्मींची काळजी घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

            महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वच्छताकर्मीप्रमाणेच क्षेत्रीय स्तरावर काम करणा-या स्थापत्य, पाणी पुरवठा, मलनि:स्सारण, उदयान व इतर विभागातील सर्व घटकांना बाहेर पडतांना टोपी वापरण्याच्या तसेच जास्तीत जास्त पाणी पिण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

            नागरिकांनीही कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळावे. बाहेर जाणे आवश्यक असल्यास टोपी, छत्री किंवा ओढणीचा वापर करावा. दररोज  किमान ५ ते ६ ग्लास पाणी प्यावे. नारळपाणी, ताक, लिंबू पाणी आणि ताज्या फळांच्या रसाचे सेवन करावा. डोके दुखणे, चक्कर येणे, अशक्तपणा ही डिहायड्रेशनची लक्षणे असू शकतात हे लक्षात घेउुन अशी समस्या उद्भवल्यास त्वरित पाणी प्यावे आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घ्यावा. विशेषत्वाने लहान मुले, गरोदर महिला, वयोवृध्द नागरिक यांची अधिक काळजी घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top