कोस्टल रोडमुळे ठाण्याचीवाहतूक कोंडी फुटणार 

२८ टक्के काम पूर्ण, दोन वर्षांत सेवेत
आमदार संजय केळकर यांची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी

ठाणे – खारीगाव ते गायमुख हा २३ किमी लांबीचा कोस्टल मार्ग हा गेम चेंजर प्रकल्प ठरणार असून तो डिसेंबर २०२८ पर्यंत खुला होणार आहे. या प्रकल्पामुळे घोडबंदर मार्गासह अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीवरचा ताण कमी होणार आहे. या प्रकल्पाचे २८ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती देताना आमदार संजय केळकर यांनी कांदळवनातील अडथळे दूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

आमदार संजय केळकर यांनी गुरुवारी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसह या प्रकल्पाची बाळकुम येथे पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती दिली.

सहा महिन्यांपूर्वी या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून ४० महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे.  या मार्गातील काही भाग कांदळवनाच्या ठिकाणी एलिव्हेटेड असून २०२८पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे श्री. केळकर यांनी माध्यमांना सांगितले.

घोडबंदर मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ठाणेकरांना  कोंडीचा सामना वर्षभर करावा लागतो. या प्रकल्पामुळे या वाहतुकीवरचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून कळव्यातून होणाऱ्या वाहतुकीलाही दिलासा मिळणार असल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली. यावेळी आढावा बैठकीत आमदार संजय केळकर यांच्यासह  संजय पाटील, सुरज दळवी, जितेंद्र मढवी व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

कांदळवनावर अतिक्रमणांचा अडथळा

कोस्टल रोडचा काही भाग कांदळवनाच्या ठिकाणी एलिव्हेटेड असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे पाहणी दौऱ्यात आढळून आले. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आला आहे. ही अतिक्रमणे कोस्टल रोड प्रकल्पाला अडथळा ठरणार असून ती तातडीने दूर करण्यात यावीत, अशा सूचना  आमदार संजय केळकर यांनी कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top