शिक्षण क्रांती संघटनेच्या मागणीमुळे दिलासा मिळणार
भिवंडी – मतदार याद्या पुनर्संवेक्षण व जनगणना कामामुळे शिक्षणावर अतिरिक्त कामाचा बोजा पडत असल्याने ते त्रस्त झाले असून त्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी शिक्षण क्रांती संघटनेच्या कल्याण डोंबिवली महानगरने दिलेल्या निवेदनाद्वारे प्रशासनाधिकारी दालनात झालेल्या बैठकीत जनगणना व बीएलओ कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर देवराम घागस, राज्य संघटक आर डी पाटील, महानगर जिल्हा अध्यक्ष गजानन पाटील, जिल्हा कार्यवाह थॅामस शिनगारे तर प्रशासना तर्फे प्रशासनाधिकारी भारत बोरनारे, विलास नंदनवार, विलास लिखारे व पिडीत कर्मचारी उपस्थित होते.शिक्षक शिक्षकेतरांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर काही मागण्या मान्य करून उर्वरित मागण्या पालिका आयुक्तांकडे सादर करून दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्यात येतील असे प्रशासनाधिकारी भारत बोरनारे यांनी सांगितले.
शिक्षण क्रांती संघटनेच्या मागण्यांनुसार मुख्याध्यापकांना जनगणना व बीएलओ कामातून वगळण्यात आले आहे, दुर्धर आजाराने ग्रस्त व सेवानिवृत्त ६ महिन्यांपूर्वी असलेल्या कर्मचाऱ्यांना सवलत देण्यात येईल,तसेच बीएलओ किंवा जनगणना यापैकी एकच काम दिले जाईल असे सांगण्यात आले.याकामी कर्मचारी कमी पडत असल्याने स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील कर्मचाऱ्यांना हे काम करण्यास आवाहन करण्यात आले आहे,सर्व विभागातील कर्मचारी समप्रमाणात घेतले जातात असे प्रशासनाधिकारी यांनी स्पष्ट केले.प्रशासना कडून मानसिक त्रास दिला जात असल्यास तसेच गुन्हे नोंदवण्याची धमकी देत राहिल्यास अशा धमकावणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच गुन्हे नोंदवून या कामांवर बहिष्कार टाकला जाईल असा ईशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचा १ कोटीचा विमा उतरवण्या बाबत जिल्हाधिकारी व शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या कामांच्या मोबदल्यात मिळणारे मानधन रोखीकरण होणाऱ्या त्याच्या खात्यावर जमा करण्यात याव्यात अशी ही मागणी करण्यात आली.


