नवी मुंबई महानगरपालिका संचालित घणसोली येथील बेघर निवारा केंद्रास आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी भेट देत तेथील व्यवस्थेची पाहणी केली आणि तेथे असलेल्या बेघर स्त्री, पुरूष नागरिकांशी संवाद साधत उपलब्ध सुविधांमध्ये वाढ करण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. अजय गडदे, उद्यान विभाग उपआयुक्त स्मिता काळे व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांनी महिला व पुरूष कक्षामधील बेघर नागरिकांशी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूस केली.
त्यांच्या खानपान व्यवस्थेचीही पाहणी केली तसेच त्यांची आरोग्य तपासणी वेळेच्या वेळी केली जात असल्याबद्दल माहिती घेतली.
याठिकाणी असलेल्या बेघर व्यक्तींना त्यांच्या आवडीनुसार विविध कलागुण जोपासण्याच्या दृष्टीने शिलाईकाम तसेच कलाकुसरीच्या कामाची संधी उपलब्ध करून द्यावी तसेच वाचण्यासाठी पुस्तकांची
सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. निवारा केंद्राच्या दर्शनी भागात पावसाळ्यापूर्वी शेड तयार करून घ्यावा तसेच बसण्यासाठी बेंच उपलब्ध करून द्यावेत अशाही सूचना त्यांनी केल्या. बेघरांची संख्या लक्षात घेऊन आणखी केंद्र सुरू करणेबाबत तपासणी करावी अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.


