भिवंडी शहरातील भाजी मार्केट परिसरात वाढलेले अतिक्रमण आणि हातगाड्यां मुळे नागरिकांना रस्त्यावर चालणेही कठीण झाले होते. बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतुकीवर ही परिणाम होत होता. याच पार्श्वभूमीवर भिवंडी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने प्रभाग समिती चे प्रभाग अधिकारी गिरीश गोष्टेकर यांच्या नेतृत्वा खाली मोठी धडक कारवाई सायंकाळी गर्दीच्या वेळी करण्यात आली.
जुन्या निजामपूर पोलिस ठाण्या समोरील तसेच आजूबाजूच्या रस्त्यांवर फळ व भाजी विक्रेत्यांनी उभारलेली अनधिकृत दुकाने, हातगाड्या आणि इतर अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आले. कारवाईदरम्यान संपूर्ण परिसरात गोंधळ पाहायला मिळाला. अतिक्रमण हटवताना काही दुकानदार आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला होता. मात्र पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू ठेवण्यात आली. बाजार परिसरातील रस्ते मोकळे करण्यासाठी हातगाड्या, तात्पुरते शेड तसेच रस्त्यावर ठेवण्यात आलेले साहित्य हटवण्यात आले. पालिकेच्या अतिक्रमण विभागा कडून शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या मोहिमे अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासना कडून देण्यात आली आहे.


