शिक्षण ही प्रगतीची मूलभूत गुरुकिल्ली आहे. शिक्षणाशिवाय व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची प्रगती अशक्य आहे. त्यामुळे आदिवासी मुला-मुलींनी शिक्षण घेऊन जीवनात पुढे जावे. या उद्दिष्टासाठी श्रमजीवी संघटनेने सुरू केलेले प्रयत्न अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन योगिनी सुर्वे यांनी केले.
श्रमजीवी संघटनेतर्फे उजगाव, ता. वसई येथे आयोजित तीन दिवसीय बालसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
पुढे मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, “शिक्षणाच्या हक्कासाठी केवळ रस्त्यावर संघर्ष करून भागणार नाही. बदलत्या काळाचा वेध घेऊन अभ्यासपूर्ण, संशोधनाधिष्ठित आणि बौद्धिक मांडणी करणेही तितकेच आवश्यक आहे.” त्यांच्या या विचारांनी उपस्थित कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना नवी दिशा दिली.
प्रारंभी कार्यक्रमाच्या संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी योगिनी सुर्वे यांचा परिचय करून दिला. वसई येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपल्या कर्तृत्याच्या बळावर उच्च पद गाठले. तसेच त्यांना भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करण्याची संधी लाभली, अशी माहिती त्यांनी दिली. श्रमजीवी संघटनेला त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल जाधव यांनी त्यांचे आभार मानले.
या समारोप कार्यक्रमाला निरंजन डावखरे हेही विशेष उपस्थित होते. त्यांनी श्रमजीवी संघटना आणि ‘समर्थन’ संस्थेच्या अभ्यासपूर्ण कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “या संस्थांकडून मिळणाऱ्या तथ्यपूर्ण माहितीचा उपयोग आम्ही विधान परिषदेत प्रश्न मांडताना आणि धोरणात्मक चर्चामध्ये प्रभावीपणे करत असतो”
तत्पूर्वी, संघटनेचे माजी अध्यक्ष रामभाऊ वारणा आणि कार्याध्यक्ष बाळाराम भोईर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्थात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा माजी अध्यक्ष विवेक पंडित आणि विद्यमान अध्यक्ष सीता घाटाळ यांनी समयोचित मार्गदर्शन केले. या शिबिरात सुमारे ३०० आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. कार्यकर्ते, पालक आणि स्थानिक नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


