कल्याण – कवी नारायण सुर्वे यांच्या ‘दोन दिवस’ या वास्तववादी कवितेवर आधारित लघुपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दिग्दर्शक अजय पाटील यांच्या या लघुपटाला इंडो आशिया इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये तिहेरी मानाचे पुरस्कार प्राप्त झाले.
अजय पाटील हे जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून, त्यांच्या दिग्दर्शनातील अनेक लघुपटांना यापूर्वीही पारितोषिके मिळाली आहेत. या स्पर्धेत ‘दोन दिवस’ला सर्वोत्कृष्ट लघुपट, सर्वोत्कृष्ट व्हॉईस ओव्हर (सुनील पाटील) आणि सर्वोत्कृष्ट कलाकार (मेघन गुप्ते) असे पुरस्कार मिळाले. हे पुरस्कार कल्याण येथील अनुराग कल्याण यांच्या नाट्य शिबिरातील अनौपचारिक कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला कवी-लेखक-दिग्दर्शक रवींद्र लाखे तसेच दिग्दर्शक-निर्माता अरविंद सरफरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
अवघ्या दोन मिनिटांच्या या लघुपटासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात आले. व्हॉईस ओव्हरसाठी सुनील पाटील यांनी दोन तास स्टुडिओमध्ये मेहनत घेतली, तर संपूर्ण चित्रीकरण कल्याण येथे एका दिवसात पूर्ण करण्यात आले. संपादनाची जबाबदारी आकाश अजय पाटील यांनी सांभाळली. कला दिग्दर्शन प्रणिती थोरात यांनी, तर संगीत दया नाईक यांनी दिले आहे. कार्यक्रमादरम्यान सुनील पाटील यांनी ‘दोन दिवस’ ही कविता सादर केली. मेघन गुप्ते यांनी चित्रीकरणातील अनुभव सांगताना दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनामुळे अभिनय अधिक प्रभावी झाल्याचे नमूद केले.
यावेळी अरविंद सरफरे यांनी लघुपटाच्या आशय, सादरीकरण आणि दिग्दर्शनाचे कौतुक करत, “अनुराग कल्याणच्या बालकलाकारांकडून अजय पाटील हे नेहमीच उत्कृष्ट अभिनय करून घेतात,” असे सांगितले. प्रमुख पाहुणे रवींद्र लाखे यांनी मेघन गुप्ते यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक करत तो अत्यंत भावनिक व प्रभावी असल्याचे नमूद केले. दिग्दर्शक अजय पाटील यांनी लघुपट निर्मितीतील अनुभव मांडताना, नारायण सुर्वे यांच्या अनेक कवितांचा अभ्यास करून ‘दोन दिवस’ ही कविता निवडल्याचे स्पष्ट केले. कामगारांच्या जीवनातील संघर्ष प्रभावीपणे मांडण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरांगी जानवे यांनी, तर आभार प्रदर्शन अनिरुद्ध देशमुख यांनी केले.



