संघर्षातून साहित्याकडे आणि अध्यापनातून समाजसेवेकडे

ठाण्याच्या जया राव यांचा प्रेरणादायी प्रवास

ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या श्रीमती जया बाळकृष्ण राव यांचे आयुष्य म्हणजे जिद्द, चिकाटी आणि कर्तृत्वाचा एक देदीप्यमान प्रवास आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महिला सक्षमीकरण मोहिमेच्या निमित्ताने त्यांचे कार्य समाजासमोर येणे ही गौरवाची बाब आहे. मूळच्या कर्नाटक राज्यातील असलेल्या जया राव यांनी केंद्रीय विद्यालय संघटन अंतर्गत सुमारे ४१ वर्षे इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आणि विभाग प्रमुख म्हणून प्रदीर्घ सेवा बजावली आहे. पुण्याच्या बी.ई.जी. केंद्रीय विद्यालयातून २००९ मध्ये निवृत्त झालेल्या राव यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ आणि एल.आय.सी. चा ‘बेस्ट टीचर पुरस्कार’ यांसारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाचा पाया हा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत रचला गेला होता. गेल्या ४० वर्षांपासून त्यांनी एकल पालकत्वाची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. घर, शासकीय नोकरी, मुलांचे शिक्षण आणि वारंवार होणाऱ्या बदल्या अशा अनेक समस्यांना तोंड देत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षित आणि स्वावलंबी बनवले, जे आज परदेशात स्थायिक आहेत.

जया राव यांचे भाषेवर कमालीचे प्रभुत्व असून मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषांमध्ये त्या प्रभावी लेखन आणि काव्य सादरीकरण करतात. विशेषतः कारगिल विजयावर त्यांनी लिहिलेली ‘ए टू झेड’ वर्णमालेतील कविता आजही अनेकांच्या स्मरणात आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी स्वतःला विश्रांतीच्या चौकटीत अडकून न ठेवता सामाजिक
आणि आध्यात्मिक कार्यात झोकून दिले आहे. त्या केवळ एक उत्कृष्ट शिक्षिकाच नव्हत्या, तर आजही त्या ‘ब्रह्मविद्या’ आणि प्राचीन योगशास्त्राच्या माध्यमातून लोकांच्या शारीरिक आणि मानसिक उन्नतीसाठी कार्य करत आहेत. कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी ‘हिरकणी पुरस्कार’ मिळवून आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली. सध्या त्या ठाण्यातील कोळशेत येथील केंद्रीय विद्यालयात मार्गदर्शनपर भेटी देतात आणि ‘उडान’ सारख्या
स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मुलांसाठी भाषा आणि योगाचे वर्ग विनामूल्य घेतात. त्यांच्या या झंझावाती प्रवासातून हेच सिद्ध होते की, जर मनात इच्छाशक्ती असेल तर वयाची कोणतीही मर्यादा स्त्रीच्या कर्तृत्वात अडथळा ठरू शकत नाही.

जिल्हा माहिती अधिकारी,
ठाणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top