कल्याण – बुद्धाचा मार्ग हा मानवतेच्या कल्याणाचा मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे “मध्यममार्ग”. या संकल्पनेवर आधारित “मध्यम मार्गाचे स्वर माधुर्य” या धम्मपदातील गाथांचे डॉ. संजय मोहोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांद्वारे संगीतमय सादरीकरणाने पालि विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमाची सांगता झाली.
दिनांक ३० एप्रिल ते ३ मे २०२६ या दरम्यान पालि विभागातर्फे विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने गांधार कलेवर आधारित बुद्धांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे फोटो आणि जातक कथांवर आधारित चित्रांची प्रदर्शनी मधे मांडण्यात आल्या होत्या. गांधारी भाषा व लिपी यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीला २६१५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून विपश्यना ध्यान, बुद्धाच्या शरीर धातूंवर आधारित विशेष व्याख्याने, सुत्तपठण, संघदान, बुद्ध रूप आणि अस्थि धातूंची मिरवणूक, आतापर्यंत झालेले २८ बुद्ध आणि त्यांचे बोधिवृक्ष यांची विशेष पूजा, दीपदान यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “*बुद्ध आणि त्यांचा धम्म” या महान ग्रंथावर त्रिपिटकाच्या आधारे शोध निबंधाचे सादरीकरण करून बाबासाहेबांना विशेष मानवंदना देण्यात आली.
डॉ. योजना भगत यांच्या नेतृत्वात आणि संकल्पनेतून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता पालि विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध स्तरातील मान्यवर संशोधक साहित्यिक सर्वसामान्य यांच्या मोठा प्रतिसाद लाभला होता. तसेच बौद्ध शिल्पकला, संस्कृती धम्म प्रचार, प्रसार, पाली भाषा साहित्य, इत्यादींची ओळख करून देण्यात आली.


