ठा णे वर्तकनगर येथील टेन एक्स परिसरातील रहिवासी सौ. स्वाती संकेत कदम यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण कार्यातून मोठी कामगिरी साध्य केली आहे. त्या 2FitA Studio या संस्थेच्या संस्थापक असून, त्यांच्या कार्याची दखल घेत प्रतिष्ठित महा गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. नुकताच त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिर येथे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
स्वाती कदम यांनी 2019 साली 2FitA Studio ची स्थापना केली. स्थापनेपासून आजपर्यंत त्यांनी फिटनेस आणि स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या संस्थेमार्फत झुंबा, योगा, ऐरोबिक्स, डान्स, भरतनाट्यम, कराटे (सेल्फ डिफेन्स), कथक, जिमनॅस्टिक्स, ड्रॉइंग क्लासेस तसेच विविध वर्कशॉप्स आणि फिटनेस कॅम्प्स आयोजित केले जातात.
कोरोना काळातही ऑनलाईन माध्यमातून लोकांना फिटनेस आणि आरोग्याबाबत मार्गदर्शन करून त्यांनी समाजासाठी मोलाचे योगदान दिले. आजही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून त्या महिलांपासून मुलांपर्यंत सर्वांसाठी सातत्याने कार्यरत आहेत.
ठाणेकर रहिवाशांसाठी ही अभिमानाची बाब असून, त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वाती कदम यांच्या यशामुळे परिसरातील इतर महिलांनाही प्रेरणा मिळत आहे.


