स्थानिक गुंडांकडून इमारत पुनर्विकासाला अडथळा

रहिवाशांची आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव

कोपरी येथील जुन्या इमारतीच्या पुनर्विकासात काही गुंडांकडून अडथळा येत असल्याने रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली आहे. श्री. केळकर यांनी थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क साधल्यानंतर या प्रकरणी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

ठाणे पूर्वेतील कोपरी भागात असलेल्या साईकृपा सोसायटीमधील रहिवाशांनी आज जनसेवकाचा जनसंवाद या
कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली. इमारत जुनी झाली असल्याने त्याचे पुनर्विकासाचे काम एक विकासकाला देण्यात आले आहे. मात्र काही गुंड विकासकाला काम करू देत नसल्याने गेली वर्षभर रहिवासी हक्काचे घर नसल्याने इतर ठिकाणी भाड्याने राहत आहेत. श्री. केळकर यांनी तत्काळ पोलीस आयुक्तांशी फोनवर संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणली. यावर आयुक्तांनी या प्रकरणी स्थानिक पोलिसांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती श्री. केळकर यांनी दिली.

या कार्यक्रमात वर्तकनगर म्हाडा वसाहतीतील इमारत क्रमांक सहाचे रहिवासी देखील उपास्थित होते. गेली दहा वर्षे या इमारतीचा विकास रखडला असून रहिवासी हवालदिल झाले आहेत. या इमारतीबरोबरच इमारत क्र.४८ ते ५० आणि ११ या इमारतींचा प्रश्न देखील अनेक वर्षांपासून आहे. लवकरच संबंधित विकासकांची आणि रहिवाशांची बैठक घेऊन पुनर्विकास मार्गी लावणार असल्याचे श्री. केळकर म्हणाले.

धाराशिव येथील शेतकऱ्याने दोन आठवड्यापूर्वी जमिनीसंदर्भात महसूल खात्याशी संबंधित समस्या आमदार संजय केळकर यांच्याकडे निवेदन देऊन मांडली होती. तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांच्यात टोलवाटोलवी होत असल्याने हे प्रकरण रखडले होते. श्री. केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top