भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाला खासदार सुरेश म्हात्रे यांनी भेट देत विविध विभागांची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी रुग्णालयातील आरोग्य सुविधा, स्वच्छता, वीज व्यवस्था आणि रुग्णांना मिळणाऱ्या सेवांचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान काही ठिकाणी वीज पुरवठा बंद असल्याने अति दक्षता विभाग बंद पडले होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी खासदार सुरेश म्हात्रे -यांनी भिवंडी शहर व तालुक्यातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच रुग्णालयातील समस्या आणि आवश्यक सुविधांबाबत राज्य सरकारसमोर पाठपुरावा करून या समस्या दूर करण्यात येतील. या पाहणी दौऱ्यावेळी रुग्णालय प्रशासनातील अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


