पंतप्रधान महोदयांनी पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने व त्यानुसार महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सकाळी 6 पासून 9 वाजेपर्यंत बेलापूर व नेरूळ विभागात अधिकाऱ्यांसमवेत सायकल चालवत पाहणी दौरा केला.
याप्रसंगी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या समवेत शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त श्री. प्रशांत नेरकर या अधिका-यांनीही सायकल चालवत पाहणी दौ-यात सहभाग घेतला.
नेरूळ सेक्टर 1 येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पाहणीला सुरूवात करीत शिरवणे, सारसोळे, कुकशेत, करावे, ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसर, सीवूड रेल्वेवरील उड्डाणपूल, पारसिक हिल, इन्कम टॅक्स कॉलनी, आग्रोळी येथील जलउदंचन – केंद्र अशा विविध भागातील स्वच्छता, शौचालये, उद्याने, मार्केट, सायकल ट्रॅक, पम्प हाऊस अशा – विविध बाबींची त्यांनी सायकलवर पाहणी करीत – आवश्यक त्या ठिकाणी थांबत संबंधित अधिकाऱ्यांना सुधारणांविषयक मौलिक सूचना केल्या.
विशेषत्वाने शिरवणे, सारसोळे, कुकशेत, करावे अशा गावांच्या परिसराची पाहणी करताना तेथील – स्वच्छतेमध्ये अधिक सुधारणा करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. गावठाणांच्या बाजूला असलेल्या सेक्टर भागातही स्वच्छतेवर अधिक भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
शिरवणे जुईनगरच्या चिंचोली उद्यानाची सुधारणा करावी असे निर्देशित करतानाच तेथील शौचालय सुस्थितीत असून त्याप्रमाणे इतर शौचालयांची स्थिती ठेवावी असे त्यांनी सूचित केले. विशेषत्वाने पाम बीच रोडवर वझिराणी स्पोर्ट्सच्या कॉर्नरला पुढे असलेले शौचालय काहीसे पाठीमागे सरकवावे असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.
सारसोळे येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या आसपासच्या परिसराची स्वच्छता करून घ्यावी तसेच त्याठिकाणचे मार्केटचे काम लवकरात लवकर करून ते उपयोगात आणावे असेही निर्देश आयुक्तांनी दिले. करावे गावाच्या कॉर्नरलाही नागरिकांची गरज लक्षात घेऊन मार्केट बनविण्याचे त्यांनी सूचित केले.
काही ठिकाणी रिकाम्या प्लॉटवर नागरिक कचरा आणून टाकतात हे पाहणी दरम्यान लक्षात येताच त्याला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसेच ते प्लॉट स्वच्छ करून घ्यावेत असे आयुक्तांनी निर्देश दिले. सेक्टर 28 आग्रोळी येथे पारसिक हिलच्या पायथ्याशी असणाऱ्या पम्प – हाऊसची तसेच स्काडा प्रणालीची बारकाईने पाहणी करीत आयुक्तांनी काही सुधारणा सुचविल्या.
पंतप्रधान महोदयांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सकाळच्या सत्रात सायकलवरून पाहणी केल्याने शहरातील सेवा-सुविधांचा प्रत्यक्ष ग्राऊंड रिपोर्ट जाणून घेता येतो व पाहणीत सायकलचा वापर केल्याने शारीरिक तंदुरूस्तीसाठी आरोग्याच्या दृष्टीनेही फायदा होतो असा दुहेरी लाभ सायकलवरून पाहणी दौऱ्यात होतो असा अप्रत्यक्ष संदेश या दौऱ्यातून प्रसारित झाला.


