नागरिक त्रस्त, जलवाहिनी दुरुस्तीमुळे पाण्यात गाळ आल्याचा पालिकेचा दावा
मिरा-भाईंदर शहरात एक दिवसाआड गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागांमध्ये पाण्यात माती आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लिटर आणि एमआयडीसीकडून १३५ दशलक्ष लिटर, असा एकूण २२१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात पाणीगळती व अन्य कारणांमुळे शहराला सुमारे २०० दशलक्ष लिटर इतकाच पाणीपुरवठा मिळत आहे. शहराची दररोजची गरज सुमारे २२५ दशलक्ष लिटर इतकी असल्याने महापालिका प्रशासनाकडून पाणीवाटपाचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. नियमित पुरवठा सुरू असताना नागरिकांना फारशी अडचण जाणवत नाही; मात्र पुरवठा खंडित झाल्यास टंचाईची समस्या तीव्र होते. दरम्यान, शुक्रवारी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने शनिवारी बहुतांश भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली. नागरिकांनी याबाबत तक्रारी करत खासगी पाणी विक्रेत्यांकडून पाणी खरेदी केले. काही नागरिकांनी दुसऱ्या दिवशी नियमित पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र रविवारी अनेक भागांत अत्यंत गढूळ पाणीपुरवठा झाल्याचे समोर आले. पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ, माती आणि घाण असल्याने घरातील टाक्या, भांडी आणि बादल्या खराब झाल्याची तक्रार नागरिकांनी केली. हे पाणी पिण्यासाठी तर दूरच, इतर घरगुती कामांसाठीही वापरता येत नसल्याचे गृहिणींनी सांगितले. तसेच गढूळ पाण्यामुळे घरात दुर्गंधी पसरल्याची तक्रारही करण्यात आली. दरम्यान, जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे पाण्यात गाळ मिसळल्याने हा प्रकार घडल्याची प्रतिक्रिया महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.


