मिरा भाईंदर महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई

मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आरक्षण क्रमांक १२२ वरील दोन अनधिकृत धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणांवर महानगरपालिकेमार्फत नियमानुसार तोडक कारवाई करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकामा संदर्भात महाराष्ट्र शासनाने दिनांक ०५/०५/२०११ रोजीच्या निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार सदरची कारवाई करण्यात आली. तसेच आरक्षण क्रमांक १२२ हे सामाजिक वनीकरण व खेळाच्या मैदानाकरीता आरक्षित होते. कारवाईपूर्वी सदर संबंधित प्रकरणातील सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर ही कारवाई हाती घेण्यात आली. महानगरपालिका प्रशासनाने सदर कारवाई अत्यंत संवेदनशीलतेने, शिस्तबद्ध नियोजनाद्वारे व कायद्याच्या चौकटीत राहून केली. कारवाईदरम्यान कोणत्याही प्रकारे सामाजिक अथवा धार्मिक सलोखा बाधित होणार नाही तसेच कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची विशेष काळजी घेण्यात आली. त्यामुळे संपूर्ण कारवाई शांततेत व कोणताही अनुचित प्रकार न घडता यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.

सदर कारवाई आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामार्फत आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महानगरपालिका प्रशासन व पोलीस यंत्रणेच्या समन्वयातून सदर कारवाई सुरळीतपणे पार पडली. कारवाईदरम्यान अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त स्वप्नील सावंत, सहाय्यक आयुक्त (प्रभाग समिती क्र. ०४) योगेश गुणीजन, सहाय्यक आयुक्त (प्रभाग समिती क्र. ०६) भरत सोनारे, सहाय्यक आयुक्त (प्रभाग समिती क्र. ०१) नरेंद्र डोंगरे यांच्यासह प्रभाग समिती क्रमांक १ ते ६ मधील अधिकारी व कर्मचारी, फेरीवाला पथक प्रमुख व महाराष्ट्र सुरक्षा बल पथक उपस्थित होते.

Scroll to Top