माळीण-इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून टेंभेवाडीत उभा राहिला श्रमजीवीचा ‘घर बांधणी सत्याग्रह’

रवर्षी पावसाळा आला की रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील टेंभेवाडीमधील दिस कातकरी कुटुंबांच्या मनात भीतीचे ढग दाटून येतात. डोंगराच्या कुशीत वसलेली ही वाडी दरड कोसळण्याच्या धोक्यात आहे. शासनाने या वस्तीला दरडग्रस्त म्हणून घोषित केले असले, तरी सुरक्षित पुनर्वसनाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबितच राहिला. पण यावर्षी येथील आदिवासी बांधवांनी भीतीसमोर हार न मानता स्वतःच्या हातांनी स्वतःचे भविष्य उभे करण्याचा निर्धार केला आहे.

श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली ७जून रोजी बारा आदिवासी कातकरी कुटुंबांनी एकत्र येत ‘घर बांधणी सत्याग्रह’ राबवला. सुरक्षित गावठाणासाठी मंजूर झालेल्या जागेवर स्वतः श्रमदान करून झोपड्या उभारण्यात आल्या. हातात फावडे, घमेले आणि बांधकामाचे साहित्य घेऊन महिला, पुरुष, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक एकाच उद्देशाने कामाला लागले होते – आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित निवारा उभा करण्यासाठी.

या आंदोलनाची ठिणगी २६ मे रोजी पडली. श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ, कार्याध्यक्ष बाळाराम भोईर आणि सरचिटणीस विजय जाधव यांनी टेंभेवाडीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. दरवर्षी पावसाळ्यात गाव सोडून समाजमंदिरात आश्रय घ्यावा लागणाऱ्या कुटुंबांचे वास्तव पाहून त्यांनी तातडीने कृती करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला या झोपड्या उभारण्यासाठी वनविभागाकडून अडवणूक केली जात होती. मात्र, श्रमजीवी संघटनेच्या खंबीर नेतृत्वाखाली जेव्हा प्रत्यक्ष ‘सत्याग्रह’ उभा राहिला, तेव्हा प्रशासनालाही माघार घ्यावी लागली. संघटनेचा हा पवित्रा पाहून वनविभाग स्वतः आदिम कातकरी बांधवांच्या झोपड्या उभारण्यासाठी मदतीला सरसावला, हे या आंदोलनाचे मोठे यश मानले जात आहे.

या संपूर्ण लढ्यात संघटनेचे कार्याध्यक्ष बाळाराम भोईर यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी टेंभेवाडी कातकरी वाडीला आपल्या हक्काप्रति उभारी देण्यासाठी थेट त्याठिकाणी जाऊन, तिथल्या लोकांसोबत राहून त्यांना संघटित केले आणि लढण्यासाठी मोठी प्रेरणा दिली. त्यांच्या या सक्रिय पाठींब्यामुळेच कातकरी बांधवांमध्ये स्वतःचा हक्क मिळवण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.

या सत्याग्रहात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ यांनी. केवळ मार्गदर्शन किंवा भाषणांपुरते मर्यादित न राहता त्यांनी स्वतः श्रमदानात सहभाग घेतला. कातकरी भगिनींसोबत खांद्याला खांदा लावून काम करत त्यांनी नव्या झोपड्या उभारण्याच्या कामात हातभार लावला. दोन लाख सभासदांच्या संघटनेची अध्यक्ष स्वतः श्रमदान करत असल्याचे दृश्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले.

८ जून रोजी झालेल्या आढावा समितीच्या बैठकीत बोलताना अध्यक्ष सीता घाटाळ म्हणाल्या, “टेंभेवाडी येथे कातकरी कुटुंबांची घरे उभी राहताना प्रत्येकाने मनापासून मेहनत घेतली. आज या ठिकाणी घरे उभी राहिली, याचे सर्व श्रेय श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणि आदिवासी कातकरी बांधवांच्या एकजुटीला जाते. संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आम्हाला सतत मार्गदर्शन आणि प्रेगष्ण देतात. गरीब, वंचित आणि आदिवासी समाजासाठी लढण्याची ताकद तेच देतात. त्यामुळेच आम्ही हे काम करू शकलो.

त्या पुढे म्हणाल्या, “आज अनेक कातकरी आदिवासी भगिनी आणि बांधव आपल्या हक्कासाठी उभे राहिले, संघटित झाले, हे आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. संघटनेच्या कुटुंबाची प्रमुख म्हणून त्यांच्या हक्कासाठी लढता आले, त्यांना मदत करता आले, हे माझे भाग्य आहे. मात्र अजूनही येथे वीज, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांचे प्रश्न कायम आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन आदिवासींचे जीवनमान सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.

टेंभेवाडीतील हा सत्याग्रह केवळ झोपड्या उभारण्यापुरता मर्यादित नव्हता. हा जगण्याच्या हक्कासाठीचा, सुरक्षित भविष्यासाठीचा आणि स्वाभिमानाने जगण्याच्या अधिकारासाठीचा संघर्ष होता. पावसाळ्याच्या तोंडावर आदिवासींनी स्वतःच्या श्रमाच्या बळावर उभारलेली ही घरे आता प्रशासनालाही जबाबदारीची जाणीव करून देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. टेंभेवाडीच्या डोंगरकड्यांवर उभ्या राहिलेल्या या झोपड्या केवळ बांबू, लाकूड आणि मातीच्या नाहीत; त्या आदिवासींच्या जिद्दीच्या, एकजुटीच्या आणि आपल्या हक्कासाठी उभे राहण्याच्या निर्धाराच्या साक्षीदार आहेत.

Scroll to Top