मिरा भाईंदरमध्ये पक्ष्यांना उघड्यावर खाऊ घातल्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

मिरा भाईंदर शहरात चौक, पदपथ आणि भाईंदर खाडी परिसरात कबुतरांना उघड्यावर खाद्य टाकले जात असल्याचे दिसून येत. पक्ष्यांची पिसे आणि विष्ठा सार्वजनिक ठिकाणी पसरत असल्यामुळे यामुळे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेने पक्ष्यांना उघड्यावर खाद्य देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता केली जात आहे. मुंबईतील दादरमधील कबूतर खान्यामुळे कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी दाणे टाकण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर, राज्य सरकारने कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा विचार करून, पावसाळी अधिवेशनात कबुतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम राबवावी, असे आदेश मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले होते. तर मिरा भाईंदर परिसरातही कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी दाणे टाकण्यास बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली जात होती. उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना जनजागृती मोहिमेबाबत लेखी व व्हॉट्सअॅपद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आजही शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कबूतरांना खाद्य टाकले जात असून परिस्थितीत कोणताही लक्षणीय बदल झालेला दिसत नाही. शहरातील पदपथ, चौक, तसेच भाईंदरमधील जेसल पार्क चौपाटी अशा विविध ठिकाणी पक्ष्यांना आणि खासकरून कबुतरांना नागरिकांकडून दाणे टाकले जातात. त्यामुळे पक्ष्यांची पिसे तसेच त्यांची विष्ठा सार्वजनिक ठिकाणी पसरत असून यामुळे श्वसनाच्या आजारांसह इतर आजार रहिवाशांना जडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तसेच कबूतरांना खाद्य टाकणे ही दया नसून ती अनवधानाने सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणारी कृती ठरू शकते, असे मत फॉर फ्युचर इंडिया या संस्थेचे संस्थापक व पर्यावरण कार्यकर्ते हर्षद ढगे यांनी व्यक्त केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना खाद्य टाकण्यास तात्काळ बंदी घालण्यात यावी, सर्व कबुतरखाने व खाद्य केंद्रांचे सर्वेक्षण करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तर याबाबत पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, पक्ष्यांना उघड्यावर खाद्य टाकण्याशी संबंधित काही तक्रारी प्राप्त झाल्या तर घनकचरा विभाग किंवा पशुसंवर्धन विभागांकडे त्या वर्ग केल्या जातात आणि मग पुढे त्यावर कारवाई होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Scroll to Top