कोंडीवर नागरिक आणि पोलिसांचा संवाद
ठाणे – शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेत त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने कोपरी वाहतूक शाखेत स्थानिक नागरिक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची छोटेखानी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत परिसरातील वाहतूक व्यवस्थेतील अडचणी, त्यावरील उपाय आणि नागरिकांच्या सहभागाची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कोपरी परिसर हा पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे रेल्वे व पूर्व कडील बस स्थानक आणि विविध उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा वाहतूक मार्ग असल्याने येथे सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणातील वाहनांच्या वर्दळीमुळे वाहतुकीचा ताण निर्माण होतो. यामुळे स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पोलिस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलिस आयुक्त संध्या भिसे तसेच कोपरी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नागरिकांच्या सूचनांना प्राधान्य देण्यात आले.
बारा बंगला परिसरातील वाहतूक कोंडी, ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षांचे व्यवस्थापन, बेशिस्त व अवैध पार्किंग तसेच वाहतूक नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. यावर वाहतूक पोलिसांनी अनधिकृत पार्किंगविरोधात कारवाई करणे आणि वाहतूक शिस्त राखण्यासाठी नियमित मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगत, अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असे स्पष्ट केले.
यावेळी वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पोलिस आणि नागरिक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व सहकार्य आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. नागरिकांच्या सहभागातून वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती वाढवून परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
“अनधिकृत पार्किंगमध्ये वाहन उभे असल्याचे आढळल्यास नागरिकांनी छायाचित्रासह माहिती 86556 54176 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावी. संबंधित तक्रारीची तत्काळ दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. तसेच तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.”
— दिलीप पाटील (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोपरी वाहतूक शाखा)


