ठाणे सिव्हिल रुग्णालयात एका दिवसात ३४ बाल शस्त्रक्रिया

जन्मतः फाटलेले ओठ, हर्निया, हायड्रोसील, रक्ताच्या गाठी, फायमोसिस, मान व पोटातील गाठी तसेच चिकटलेली बोटे यांसारख्या जन्मजात आणि गंभीर व्याधींनी त्रस्त असलेल्या बालकांना नवजीवन देण्याचे काम ठाणे जिल्हा सामान्य (सिव्हिल) रुग्णालयाने केले आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत रविवारी एका दिवसात तब्बल ३४ बालकांवर विविध शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या.

ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलांना या उपक्रमाचा मोठा लाभ झाला. खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपयांचा खर्च येणाऱ्या अनेक शस्त्रक्रिया शासनाच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. त्यामुळे अनेक पालकांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू तरळले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रियांसाठी दाखल झालेल्या बालकांच्या राहण्याची, जेवणाची आणि इतर आवश्यक सुविधांची संपूर्ण व्यवस्था रुग्णालय प्रशासनाने केली होती. के ई एम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ. संजय ओक व टीमने अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून सर्व शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. आजही अनेक पालक आर्थिक अडचणींमुळे मुलांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलतात. अशा कुटुंबांसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आशेचा किरण ठरत आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास अनेक बालकांचे आयुष्य निरोगी व सक्षम होऊ शकत अशी माहिती आरबीएसके जिल्हा कार्यक्रम समन्वयक विनोद जोशी यांनी दिली.

सरकारी रुग्णालयांमध्येही उच्च दर्जाच्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे होऊ शकतात, याचे ठळक उदाहरण ठाणे सिव्हिल रुग्णालयाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. हा उपक्रम केवळ वैद्यकीय सेवा नसून, गरजू कुटुंबांच्या जीवनात आनंद आणि विश्वास निर्माण करणारी सामाजिक बांधिलकी आहे.

Scroll to Top