नालेसफाई प्रकरणी शिवसेना नगरसेविका माया कांबळे आक्रमक
पावसाला आजपासून सुरवात झाली असून दरवर्षी प्रमाणे यावर्षी पावसाला उशिरा सुरवात झाली असतांना देखील नालेसफाई झाली नसून वालधुनी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. हा वालधुनी नदीतील कचरा आणि गाळ त्वरित न उचलल्यास हा कचरा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणून टाकू असा इशारा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १० च्या शिवसेना नगरसेविका माया कांबळे यांनी दिला आहे. यंदा पाउस उशिरा सुरु झाला असन, नालेसफाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पुरेसा अवधी मिळाला होता. मात्र तरी देखील केडीएमसी क्षेत्रात अनेक ठिकाणी नालेसफाई झाली नसून अनेक मोठे तसेच छोटे नाले कचऱ्याने भरलेले आहेत. असे असतांना केडीएमसीच्या प्रभाग क्र. १० मध्ये येणाऱ्या वालधुनी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. मोठ्या पावसाने याठिकाणी असलेल्या आजूबाजूच्या वालधुनी अशोक नगर वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरते. यामुळे नागरिकांच्या घरात पाणी साचून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.
याच वालधुनी नदी पात्रात साचलेल्या कचऱ्याची पाहणी स्थानिक शिवसेना नगरसेविका माया कांबळे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी केडीएमसी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.


