कोपरखैरणे येथे १०९ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाने संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून रविवारी ज्ञान विकास संस्था कॉलेज मैदान, कोपरखैरणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात व निःस्वार्थ सेवाभावाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये 109 युनिट रक्त संकलित केले गेले. शिबिराचा शुभारंभ मुंबई येथे प्रचार दौऱ्यावर आलेले रांची (झारखंड) येथील ब्रह्मज्ञान प्रचारक विजय कुमार यादव यांच्या मुख्य उपस्थितीत निरंकार प्रभूच्या प्रार्थनेने झाली. याप्रसंगी संत निरंकारी मिशनचे स्थानिक सेक्टर संयोजक तसेच मुखी यांच्या व्यतिरिक्त ज्ञान विकास संस्थेचे संचालक प्रसाद पाटील, नगरसेवक डी. आर. पाटील, शिरीष पाटील, समाजसेवक सुनिकेत हांडे, मयूर धूमाळ हे मान्यवर विशेष उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात स्थानिक सत्संगातील भक्त, सेवादल स्वयंसेवक तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांशी संवाद साधून त्यांच्या या उदात्त कार्याचे कौतुक केले तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या मानवसेवेतील सातत्यपूर्ण योगदानाची प्रशंसा केली. रक्तदानासाठी एकूण १२७ भक्तांनी नोंदणी केली असून त्यापैकी १०९ युनिट रक्त यशस्वीरित्या संकलित करण्यात आले. रक्तसंकलनाची संपूर्ण प्रक्रिया संत निरंकारी ब्लड बँकेमार्फत पार पडली. ब्लड बँकेच्या डॉक्टर व वैद्यकीय पथकाने शिबिरादरम्यान समर्पित सेवा बजावली. रक्तदात्यांसाठी नोंदणी, हिमोग्लोबिन तपासणी, अल्पोपहार तसेच रक्तदानानंतर विश्रांतीची उचित व्यवस्था करण्यात आली होती.

Scroll to Top