कोपरी-पाचपाखाडीत मतदार पुनरिक्षण मोहिमेला वेग

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गणना अर्ज’ चे वाटप

१४७ – कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी आणि जनजागृती मोहिमेने गती घेतली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि उपजिल्हा निवडणूक अधिकार वैशाली माने यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदारसंघातील नागरिकांना प्रत्यक्ष भेट देऊन ‘Enumeration Form’ (गणना अर्ज) वाटप करण्यात आले.

प्रशासकीय यंत्रणा थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचल्याने या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी १४७-कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पुरुषोत्तम थोरात, ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका नम्रता भोसले-जाधव, निवडणूक नायब तहसिलदार संजय साळुंके, बी.एल.ओ. उमेश खेडकर आणि महसूल सहाय्यक बापू पारेकर यांच्यासह इतर शासकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदार यादी भाग क्रमांक २९७ मधील अनुक्रमांक १३५ चे रहिवासी सुरेंद्र इंदर भाटिया, अनुक्रमांक १३६ च्या कविता सुरेंद्र भाटिया, अनुक्रमांक २८७ चे विनोद गंगाधर पेणकर आणि अनुक्रमांक ४७१ च्या जयश्री विनोद पेणकर या मतदारांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘Enumeration Form’ सुपूर्द करण्यात आले.

हा उपक्रम विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.’एसआयआर’ (SIR) मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार यादीतील सर्व त्रुटी दूर करून ती पूर्णपणे अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक बनवणे हा असतो. या प्रक्रियेअंतर्गत मतदारसंघात नव्याने राहण्यास आलेल्या नागरिकांची नोंद करणे, दुबार किंवा स्थलांतरित नावांची छाटणी करणे आणि पात्र तरुण मतदारांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले जाते. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी ही अद्ययावत मतदार यादी अत्यंत पायाभूत ठरते. एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून निवडणूक विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी घरोघरी जाऊन अविरत परिश्रम घेत आहेत.

Scroll to Top