ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल निलेश सांबरे यांचा मुरबाड येथील नागरिकांच्या वतीने म्हसा रोडवरील कुणबी समाज हॉल येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी, युवक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना निलेश सांबरे यांनी उपस्थितांचे आभार मानत आपल्या विजयाचे श्रेय जनतेला दिले. ते म्हणाले, “या निवडणुकीत मी अनेक प्रस्थापितांच्या विरोधात एकट्याने लढलो. कोणत्याही मोठ्या पॅनेलची साथ नसतानाही ठाणे व पालघर जिल्ह्यातील सभासद, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेची ताकद माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळेच हा विजय शक्य झाला. हा केवळ माझा विजय नसून परिवर्तनावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सभासदाचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा विजय आहे. या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही.”
यावेळी त्यांनी बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी सभासदांचा विश्वास जपणे, पारदर्शक प्रशासन राबविणे, स्थानिकांना न्याय देणे, शेतकरी व सहकार क्षेत्राला बळकटी देणे आणि ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्यातील आदर्श सहकारी बँक बनविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी निलेश सांबरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


