नियम मोडणाऱ्या वाहनांवर आयटीएमएस कॅमेऱ्याचा वॉच
ठाणे वाहतूक पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत ठाणे वाहतूक आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल ३५० अत्याधुनिक आयटीएमएस कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी या भागांचा समावेश आहे. या विस्तीर्ण परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) लागू केली आहे. ठाणे शहरात ही प्रणाली १ सप्टेंबर २०२५ पासून कार्यान्वित करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात कॅडबरी जंक्शनवर १२ अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आता नितीन कंपनी जंक्शनवर ही प्रणाली सुरू होत आहे.
नितीन कंपनी सिग्नलवर एकूण आठ हाय-डेफिनिशन कॅमेरे चारही दिशांनी येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवतील. हे कॅमेरे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित असल्याने वाहनचालकांनी केलेले नियमभंग आपोआप टिपुन त्याची नोंद करतील. झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, स्टॉप लाईन ओलांडणे, लाल सिग्नल तोडणे, दुचाकीवर तिघांचा प्रवास, हेल्मेटशिवाय वाहन चालविणे आणि चारचाकीत सीट बेल्ट न लावणे अशा विविध उल्लंघनांवर थेट कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, पुढील टप्प्यात तीनहात नाका, माजिवडा, कापुरबावडी, आनंदनगर, ओवळा, अंजूर फाटा, कल्याण नाका आणि दिघे चौक येथेही आयटीएमएस कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. संपूर्ण यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार असून वाहतुकीवर सतत नजर ठेवली जाणार आहे.


