एमएमआर भागात पिंक ई-रिक्षांसाठी मार्ग निश्चित करून इलेक्ट्रिक वाहनांना चालना द्या-प्रताप सरनाईक

मुंबई महानगर प्रदेश परिसरात महिला ई-रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा विशिष्ट मार्गाचे निश्चितीकरण करण्यात यावे, जेणेकरून इलेक्ट्रिक वाहनांना चालना मिळेल. तसेच ई-रिक्षांचा वेग आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी बॅटरी तंत्रज्ञानातील सुधारणा आणि पर्यायांबाबत संबंधित कंपन्यांसोबत तातडीने चर्चा करण्यात यावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महिला ई-रिक्षा योजनेच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, महिला व बालविकास विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, कमी वेगाच्या ई-रिक्षा मुख्य रस्ते किंवा महामार्गावर चालविण्याऐवजी अंतर्गत मार्गावर चालविल्यास वाहतुकीवर परिणाम होणार नाही. यासाठी वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाने संयुक्तपणे योग्य मार्ग निश्चित करावेत.

Scroll to Top