उधळा फाटा ते हट्टीपाडा मार्गावरील पूल मोजतोय शेवटची घटिका

मोठ्या अपघाताची शक्यता, ग्रामस्थांमधून संताप

मोखाडा तालुक्यातील उधळा फाटा ते हट्टीपाडा जाणाऱ्या मार्गावरील अत्यंत जुना असलेला पूल सध्या आपली शेवटची घटका मोजत आहे. या पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असून, यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. कोणत्याही क्षणी येथे एखादा मोठा अपघात घडण्याची भीती निर्माण झाली असून, प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. उधळा फाटा ते हट्टीपाडा हा मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कसारा-खोडाळा या मुख्य राज्यमार्गावरून पुढे काष्टी, सावर्डे, आणि किनिस्ते या गावांना जोडण्यासाठी स्थानिक नागरिक, शाळकरी मुले आणि नोकरदार याच रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. साधारण पाच वर्षांपूर्वी ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजने’ अंतर्गत या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण आणि खडीकरणाचे काम करण्यात आले. रस्ता गुळगुळीत झाल्यामुळे वाहनचालकांना तात्पुरता दिलासा मिळाला खरा, मात्र या योजनेदरम्यान रस्त्यावरील मुख्य पुलाच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले. रस्ता नवा झाला, पण पूल मात्र तसाच जुना आणि जर्जर राहिला. हा पूल कमालीचा अरुंद आहे. पुलाची रुंदी एवढी कमी आहे की, एका वेळी केवळ एकच वाहन कसबसे यावरून जाऊ शकते. समोरून दुसरे वाहन आल्यास वाहतूक कोंडी तर होतेच, पण वाहने मागे-पुढे करताना चालकांचा कस लागतो. त्यातच सर्वात गंभीर बाब म्हणजे या पुलाला कोणत्याही प्रकारचा संरक्षण कठडा किंवा सुरक्षिततेसाठी जाळी बसवण्यात आलेली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने किंवा वाहतुकीमुळे या पुलावर पूर्णपणे मातीचे साम्राज्य पसरले आहे. रस्ता आणि पुलावर साचलेल्या या चिखलमय मातीमुळे दुचाकी व चारचाकी वाहने घसरून थेट पुलावरून खाली कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. थोडासाही ताबा सुटल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. या पुलाच्या अत्यंत दुरावस्थेबाबत आणि त्यावरून निर्माण झालेल्या धोक्याबाबत स्थानिक प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा मोखाडा पंचायत समिति माजी सभापती प्रदीप वाघ, स्थानिक सरपंच लता वारे यांच्यासह हट्टीपाडा आणि परिसरातील ग्रामस्थांनी पुलाच्या नवीन बांधकामासाठी संबंधित विभागाला वेळोवेळी निवेदने दिली आहेत, आंदोलनाचे इशारे दिले आहेत. मात्र, अद्यापही या लोकप्रतिनिधींच्या आणि ग्रामस्थांच्या न्याय्य मागणीला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. केवळ आश्वासनांपलीकडे पुलाचे नवीन बांधकाम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. हट्टीपाडा, काष्टी, सावर्डे आणि किनिस्ते परिसरातील हजारो नागरिकांचा दैनंदिन संपर्क या पुलाशी येतो. दररोज शेकडो वाहने येथून ये-जा करतात. हा पूल कोसळल्यास किंवा येथे एखादा अपघात झाल्यास संपूर्ण परिसराचा संपर्क तुटणार आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांचा संयम सुटत चालला असून, प्रशासनाने तात्काळ या पुलाचे नवीन बांधकाम सुरू केले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रदीप वाघ, सरपंच लता वारे व समस्त हट्टीपाडा ग्रामस्थांनी दिला आहे. ‘पाच वर्षांपूर्वी रस्ता चांगला झाला खरा, पण या जुन्या आणि अरुंद पुलाने आमचे जीणे कठीण केले आहे.

Scroll to Top