छप्पर नसल्याने पावसात भिजतोय संसार
शहापूर – शहापूर तालुक्यातील साकुर्ली ग्रामपंचायत हद्दीतील सावरपाडा-कातकरवाडी येथील काही घरकुल लाभार्थी कुटुंबांवर भर पावसाळ्यात अत्यंत हालअपेष्टांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत मंजूर घरांचे सुमारे ५० टक्के बांधकाम पूर्ण झाले असले, तरी पुढील हप्ता खात्यात जमा न झाल्याने छप्पराचे काम रखडले आहे. परिणामी संबंधित कुटुंबांना प्लास्टिकच्या ताडपत्रीचा आधार घेऊन लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह उघड्यावर राहावे लागत आहे. रवींद्र वाघ, संतोष वाघ, बाबू वाघ, अरुण वाघ, रवींद्र वाघ आणि वामन वाघ या लाभार्थ्यांच्या घरकुलांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असून छप्पराचे काम निधीअभावी थांबले आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने स्वतःच्या खर्चाने उर्वरित बांधकाम पूर्ण करणे त्यांना शक्य नसल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे भर पावसात ताडपत्रीखाली राहण्याची वेळ आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली असून, उर्वरित हप्ते तातडीने वितरित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पंचायत समिती, शहापूर येथील घरकुल विभागातील अधिकाऱ्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून मंजूर झालेल्या हप्त्यांचे पेमेंट आमच्याकडून ट्रान्सफर करण्यात आले आहे. मात्र काही लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा झाली नसेल, तर त्यामागे संबंधित बँक खात्याची केवायसी अपूर्ण असणे, खाते निष्क्रिय असणे किंवा खात्यात आवश्यक किमान शिल्लक नसल्याने व्यवहारास तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी तातडीने आपल्या बँक खात्याची केवायसी पूर्ण करून संबंधित बँकेशी संपर्क साधावा व खाते सक्रिय करून घ्यावे. त्यानंतर निधी जमा होण्यास येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात.
अधिकाऱ्यांच्या या स्पष्टीकरणानंतर लाभार्थ्यांनीही आपल्या बँक खात्यांची पडताळणी करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज व्यक्त होत आहे.


