ठाण्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची समीक्षा

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली महत्त्वाची आढावा बैठक

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने, अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र राज्य) श्री. एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे जिल्ह्यातील कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त तयार करण्यासाठी प्रत्येक टप्प्यातील काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावे, तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या कामाचे नियमित परीक्षण करून प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवावे, अशा सक्त सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या आढावा बैठकीला ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे, मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, भिवंडी निजामपूर महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने आणि सर्व संबंधित मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराची माहिती प्रत्यक्ष पडताळणे, गणना फॉर्म काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, प्राप्त अर्जाची वेळेत छाननी करून प्रलंबित बाबी तातडीने निकाली काढणे आणि कोणताही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले. श्री. एस. चोक्कलिंगम म्हणाले की, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हा मतदार यादी अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे.

Scroll to Top