ठाणे-मुंबईची पाणी चिंता मिटली; भातसा नदी पात्रात लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा
एकीकडे तानसा, मोडकसागर धरण भरली असताना आता भातसा धरण ८८ टक्के भरलं आहे. यामुळे भातसा धरणाचे पाचही दरवाजे उघडले असून यामुळे भातसा नदी पात्रा लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे या संततधार सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे. यापूर्वी तानसा, मोडकसागर धरण भरली आहेत. आता त्या पाठोपाठ भातसा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे पाचही दरवाजे वक्रद्वारे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. यामुळे भातसा नदीपात्रात ८६.७६५ क्युमेक्स (३०६४.१०६ क्युसेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
भातसा धरणाची पाणीपातळी १३७.६६ मीटर झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणीवाढ झाल्याने पाण्याचा संभाव्य प्रवाह वाढत असल्याने जलाशय परिचलन सूचीनुसार पाणीपातळी नियमित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, भातसा धरण प्रशासन विभागाने धरणाचे पाच दरवाजे उघडले असून या अधिकच्या वाढत्या पाणी प्रवाहामुळे भातसा नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आले असल्याचे भातसा धरण विभाग प्रशासनाने म्हटले आहे.


