टॅक्सी चालकांना केवळ सेवा पुरवठादार न ठेवता सहकारी संस्थेचे भागीदार बनविण्याचा उद्देश ‘नमो सहकार टॅक्सी’ योजनेचा असून, या माध्यमातून चालकांना स्वाभिमान, मालकी हक्क आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळणार असल्याचे प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस अॅड. निरंजन डावखरे यांनी केले.
देवदत्त सहकारी वाहतूक व पर्यटन संस्था, मुंबई आणि भारतीय जनता पार्टी, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टॅक्सी चालक-मालकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय केळकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. डावखरे म्हणाले की, या योजनेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक चालकाला संस्थेचे पाच शेअर्स देण्यात येणार असून तो सहकारी संस्थेचा सभासद आणि भागीदार बनेल. त्यामुळे संस्थेच्या भागभांडवलात त्याचा थेट सहभाग राहील. चालकांना केवळ उत्पन्नाचे साधन नव्हे, तर संस्थेच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये सहभाग, समस्या मांडण्याचा अधिकार आणि व्यवस्थापनात प्रतिनिधित्वाची संधीही मिळणार आहे.
सहकार क्षेत्रातील पारदर्शकता, लोकसहभाग आणि सामूहिक मालकी ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये असल्याचे सांगत, “ड्रायव्हर नाही, भागीदार बना,” हा या योजनेचा मुख्य संदेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खाजगी अॅग्रीगेटर कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करून टॅक्सी चालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि निर्णयक्षम बनविण्याचा या योजनेचा उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मेळाव्यात टॅक्सी चालक व मालकांनी विविध समस्या मांडल्या. त्या शासन आणि संबंधित विभागांकडे प्रभावीपणे मांडून त्यावर मार्ग काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही डावखरे यांनी दिली.
या मेळाव्यास देवदत्त सहकारी वाहतूक व पर्यटन संस्थेचे पदाधिकारी, टॅक्सी चालक-मालक तसेच भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


