मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर जीवघेणे खड्डे; कोशिंबी परिसरात अपघातांचा धोका

भिवंडी मुंबई-नाशिक-आग्रा राष्ट्रीय
महामार्गावरील कोशिंबी परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अपघाताचा सापळा ठरत असून, पावसाळ्यात परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गाची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरक्षित करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

मुंबई, ठाणे, भिवंडी, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने प्रवास करतात. मात्र कोशिंबी परिसरात रस्त्यावर पडलेल्या खोल खड्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. परिणामी, वाहनांचा तोल जाऊन अपघात होण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वाहनचालकांकडून नियमितपणे टोलची वसुली केली जात असली तरी महामार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणेकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

त्यामुळे वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ‘टोल भरूनही सुरक्षित रस्ता मिळत नसेल, तर टोल वसुलीचा नेमका उपयोग काय?’ असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, कोशिंबी येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या आराखड्यात उड्डाणपुलाचा समावेश होता, मात्र नंतर तो वगळण्यात आला.

Scroll to Top