अतिवृष्टी की वृक्ष व्यवस्थापनातील त्रुटी? महापालिकेच्या नियोजनावर उपस्थित झाले प्रश्न
हवामान बदल आणि एल निनोच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात झाडे पडण्याच्या घटनांनी चिंतेत भर घातली आहे. १ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत ठाणे महापालिका हद्दीत तब्बल ६४९ झाडे कोसळली, तर २७१ झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, ही आकडेवारी केवळ अतिवृष्टीची नसून, शहरातील वृक्षसंवर्धन, शहरी नियोजन आणि महापालिकेच्या वृक्ष व्यवस्थापनावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरत आहे.
याच कालावधीत झाडे आणि फांद्या मिळून एकूण १२० घटना नोंदविण्यात आल्या. त्यामुळे या घटनांना केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणून पाहण्याऐवजी त्यामागील पर्यावरणीय आणि मानवनिर्मित कारणांचा अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, झाडे केवळ मुसळधार पावसामुळे कोसळत नाहीत. शहरातील रस्ते, पदपथ आणि इतर विकासकामांदरम्यान झाडांच्या बुंध्याभोवती मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रीटीकरण केले जाते. त्यामुळे मुळांना हवा, पाणी आणि नैसर्गिक विस्तार मिळत नाही. अनेक ठिकाणी विकासकामांवेळी मुळांची हानीही होते. परिणामी झाडांची जमिनीवरील पकड कमकुवत होते आणि जोरदार पाऊस किंवा वाऱ्याच्या तडाख्यात ती सहज उन्मळून पडतात.
यंदा एल निनोचा प्रभाव असतानाही ठाण्यात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाला. हवामान बदलामुळे कमी कालावधीत होणारी अतिवृष्टी, वेगवान वारे आणि जमिनीत वाढणारा ओलावा यामुळे आधीच कमकुवत झालेल्या झाडांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला. त्यामुळे हवामान बदल आणि अपुऱ्या वृक्ष व्यवस्थापनाचा दुहेरी परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आल्याचे पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी सांगितले.
झाडांची नियमित ‘ट्री हेल्थ ऑडिट’, वैज्ञानिक छाटणी, बुंध्याभोवती मोकळी माती आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरेल अशी व्यवस्था याकडे अद्याप अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नाही. केवळ वृक्षलागवड नव्हे, तर झाडांचे आरोग्य आणि संवर्धन अधिक महत्त्वाचे आहे.


