स्थानिकांनी दिला आंदोलनाचा इशारा
भिवंडी ठाणे मार्गावरील राहनाळ येथे रविवारी (२) खड्यामुळे भीषण अपघात होऊन एका महिलेच्या अंगावरून कंटेनर गेल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पती जखमी होण्याची हृदयद्रावक घटना घडली. या रस्त्यावरील खड्यांमुळे अपघात होऊन अनेक निष्पापांन्ना जीव गमवावा लागत आहे तर अनेक जण जखमी होत आहेत. या रस्त्यांच्या दुरावस्थेतला सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक राहनाळ ग्रामपंचायतीचे सरपंच प्रताप पाटील यांनी केला आहे. अंजुरफाटा ते कशेळी दरम्यानच्या रस्त्यावर खड्डे असून याबाबत राहनाळ ग्रामपंचायतीने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागास पत्रव्यवहार करून खड्डे बुजविण्या साठी पाठपुरावा केला आहे. परंतु त्यांचे असलेले दुर्लक्ष यामुळे रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणावर झाले असल्याने यामुळे नाहक दुचाकी चालकांचा बळी जात आहे.
आम्ही केलेल्या पत्रव्यवहारानुसार वेळीच खड्डे बुजवले असते तर ही वेळ आली नसती व एका महिलेचा जीव वाचला असता अशी खंत व्यक्त करीत आता तरी प्रशासनाला जाग येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर खड्डे भरले नाहीत तर या परिसरातील सर्व ग्रामपंचायती मधील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा सरपंच प्रताप पाटील यांनी दिला आहे.


