शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क असून आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या सामाजिक भावनेतून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण कोकणात ३५ लाख मोफत वही वाटप अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शहापूर तालुक्यातील अघई केंद्रातील १९ शाळांमध्ये मोफत वही वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या उपक्रमामध्ये टहारपूर हायस्कूल, टहारपूर जिल्हा परिषद शाळा, वाघिवली, नेवरे, डिंभे, ठाकूरपाडा, मोहिली, चिंचपाडा, भावसे, खोस्ते, बीबीचा पाडा, भुईशेत, गरेलपाडा, चक्कीचापाडा, पेंढरी, पारेला, चराचापाडा, बोराला आणि अघई येथील सुमारे १,४०० विद्यार्थ्यांना जवळपास ४,५०० मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी या सामाजिक उपक्रमाचे मनापासून स्वागत करत जिजाऊ संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी जिजाऊ संघटनेचे कार्याध्यक्ष धीरज सांबरे, जिजाऊ संघटना शहापूर अध्यक्ष तथा रत्नागिरी संपर्क प्रमुख दिनेश निमसे, जिजाऊ संस्थेचे सुदर्शन पाटील, किशोर धसाडे, सुनील निपुर्त, जयवंत गोदडे, विनोद निमसे, यशवंत वाख,आशिष कटारे तसेच जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिनेश निमसे म्हणाले, ‘निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली जिजाऊ संस्था शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने लोकाभिमुख उपक्रम राबवत आहे. वही वाटप हा केवळ साहित्य वितरणाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करण्याचा संकल्प आहे. शहापूर तालुक्यातील एकही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हा संस्थेचा निर्धार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले आहे, त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य जिजाऊ संस्था करेल, विद्यार्थ्यांनी केवळ जिद्द, मेहनत आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.’ यावेळी सुदर्शन पाटील यांनी सांगितले की, शहापूर तालुक्यातील उर्वरित सर्व शाळांमध्येही पुढील काही दिवसांत मोफत वहीं वाटप अभियान पूर्ण करण्यात येणार असून हजारो विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या अभियानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होत असून जिजाऊ संस्थेचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

