संगमेश्वर : संगमेश्वर-नायरी मार्गावरील कसबा
हायस्कूलजवळील मोरीची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून, मोरीला मोठे तडे गेल्याने ती कधीही खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोक्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
संगमेश्वर-कसबा-नायरी हा तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा संपर्क मार्ग मानला जातो. या मार्गावरून नायरी, शृंगारपूर, फणसवणे, तांबडीसह अनेक गावांतील नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुरू असतो. याच मार्गावरून पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेले कर्णेश्वर मंदिर, रामेश्वर पंचायत क्षेत्र तसेच प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज स्मारकाकडेही पर्यटक मोठ्या संख्येने ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. कसबा मोहल्ला परिसरातील संबंधित मोरीला मोठे तडे गेल्याने तिची संरचनात्मक मजबुती धोक्यात आली आहे. या मार्गावरून अवजड वाहने तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसांची नियमित वाहतूक सुरू असल्याने संभाव्य दुर्घटनेची भीती अधिकच वाढली आहे.
स्थानिकांच्या मते, मोरी कोसळल्यास संगमेश्वर-नायरी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ शकते. परिणामी नायरी, शृंगारपूर, फणसवणे, तांबडी आदी गावांचा संपर्क विस्कळीत होऊन विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, नागरिक तसेच पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो.
संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून मोरीची दुरुस्ती अथवा पुनर्बाधणी करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.


