राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनोखे आंदोलन
भिवंडी महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात झालेल्या इमारत दुर्घटनेत दहा जणांचे बळी गेले. तर शहरातील रस्त्यांची पावसामुळे चाळण झाली आहे. रस्त्यांवरील खड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. तर शहरातील कचरा उचलला जात नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या विरोधात अनेकांच्या मनात असंतोष खदखदत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांनी पालिका मुख्यालयात गनिमी काव्याने प्रवेश करीत आयुक्त कार्यालयाच्या बाहेरील लोखंडी ग्रीलला टाळे ठोकून जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनात पदाधिकारी अरुणा अंकम, सिद्धार्थ गोरे, शमीम अन्सारी, रणजीत बालीया, महेश येमुल आदी सहभागी झाले होते.
पालिका क्षेत्रात इमारत दुर्घटनेत दहा जणांचे बळी गेले. अशा वेळेस रजेवर असलेल्या आयुक्तांनी रजा रद्द करून या ठिकाणी येणे गरजेचे होते. परंतु ते बेफिकीर राहिले त्यामुळे पालिका क्षेत्रात अनागोंदी माजलेली आहे. पालिका क्षेत्रातील रस्त्यांची पावसामुळे खड्डे पडून दुर्दशा झाली आहे. त्यामुळे अनेकांचे अपघात होत आहेत. शहरातील कचरा ठेकेदाराकडून कचरा उचलला जात नाही आणि त्यामुळेच नागरिकांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे म्हणून मी हे आंदोलन केले आहे अशी प्रतिक्रिया प्रवीण पाटील यांनी दिली आहे. या आंदोलनानंतर आंदोलकांनी महापौर दालनात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवून ठेवले. महापौरांचे स्वीय सहाय्यक यांनी महापौरांशी मोबाईल वर संपर्क साधून दिल्यानंतर आंदोलक माघारी गेले. स्थानिक निजामपूर पोलिसांनी पालिका मुख्यालयात धाव घेत पोलिसांनी आयुक्त कार्यालयाचे टाळे अर्धा तासाने उघडले.


