श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सज्ज झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने यंदा ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत ५,२२० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. गणेशोत्सवाच्या जादा वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच एसटीचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, “गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या भावविश्वाशी घट्ट जोडलेला सण आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही नफा-तोट्याचा विचार न करता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सज्ज आहे. यंदा सुमारे ५,२२० जादा बसेस कोकणातील विविध मार्गावर धावणार आहेत.” या जादा बसेसचे आरक्षण npublic. msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रवाशांना बसस्थानकांवर तसेच MSRTC Bus Reservation या अधिकृत मोबाईल अॅपद्वारेही आरक्षण करता येणार आहे.


