ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अरुण पाटील यांचा भव्य नागरी सत्कार

ठाणे – पालघर जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धसईनगरीत घोलप, विशे व चौधरी परिवाराच्या वतीने अरुण पाटील (कथोरे) यांचा प्रथमच भव्य नागरी सत्कार समारंभआयोजित करण्यात आला होता. यावेळी अरुण पाटील यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना आमदार किसन कथोरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

‘आपल्या नात्यातील तसेच समाजातील एक यशस्वी उद्योजक एवढ्या मोठ्या बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा यथोचित सन्मान व्हावा, या उद्देशाने हा सत्कार समारंभआयोजित केला, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा भाजपा कल्याण शहर उपाध्यक्ष कमलाकर घोलप यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना अरुण पाटील यांनी आयोजकांचे आभार मानत अध्यक्षपदाची जबाबदारी मोठी असून ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला. बँकेच्या प्रशासकीय कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता आणण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मला करण्यासारखे जे शक्य आहे तेच मी बोलतो आणि तेच करण्याचा प्रयत्न करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुरबाड तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी बँकेच्या माध्यमातून अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अरुण पाटील यांनी सांगितले. तळेगाव व मोरोशी येथे बँकेच्या नवीन शाखा सुरू करण्याबाबत प्रयत्न, बँकेत झेरॉक्स मशीनची सुविधा, शेतकऱ्यांसाठी आगाऊ क्रेडिट कर्जासंदर्भात सकारात्मक निर्णय तसेच जामीनदारांना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

याशिवाय शेतकरी, बेरोजगार युवक आणि दुग्धव्यवसायाला आर्थिक बळ देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले. सहकार क्षेत्राकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, सहकाराच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधता येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

या नागरी सत्कार समारंभास टीडीसी बँकेचे संचालक सौरभपवार, जिल्हा परिषद माजी सदस्य उल्हासभाऊ बांगर, अनिल घरत, हरिचंद्र घोलप, प्रकाश पवार, अशोक फनाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अरुण पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Scroll to Top