शारदा विद्यालयाकडे जाणारा रस्ता जलमय

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

भिवंडी – भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ मधील विद्यानगर परिसरात शारदा विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय तसेच कला-वाणिज्य महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटल्याने पाणी रस्त्यावर साचत असून, त्यात पावसाच्या पाण्याची भर पडल्याने संपूर्ण मार्ग चिखलमय व जलमय झाला आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक ये-जा करतात. मात्र, साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढत शाळा व महाविद्यालय गाठावे लागत आहे. चिखलामुळे घसरण्याची शक्यता असून, विद्यार्थ्यांचे कपडे व दप्तर खराब होण्याबरोबरच दुखापत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दुचाकीस्वारांसाठीही हा मार्ग धोकादायक ठरत आहे. विशेष म्हणजे रस्त्यालगतच्या गटारातील घाण, सांडपाणी व कचरा साचलेल्या पाण्यात मिसळत असल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. दूषित पाणी दीर्घकाळ साचून राहिल्यास डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. या समस्येची तातडीने दखल घेण्याची मागणी शारदा विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, पडघे यांच्या वतीने पडघा ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. फुटलेली पाइपलाइन तातडीने दुरुस्त करून पाण्याची गळती थांबवावी, रस्त्यावर साचलेले पाणी व चिखल हटवावा तसेच गटाराची स्वच्छता करून पाण्याचा योग्य निचरा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Scroll to Top