अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई करा-आ. संजय केळकर
मोबाईल टॉवर कंपन्या आणि बड्या विकासकांकडील कोट्यवधींची मालमत्ता कर थकबाकी वसूल करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत असताना सर्वसामान्य ठाणेकरांवर १२ टक्के करवाढ लादली जात आहे. आधी थकबाकी वसूल करून अकार्यक्षम अधिकारी – कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली.
खोपट येथील भाजप कार्यालयात झालेल्या ‘जनसेवकाचा जनसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. महापालिकेची थकबाकी ६०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचा दावा त्यांनी केला.
हजुरी एसआरए प्रकल्पातील रहिवाशांचे थकीत भाडे आणि घरांचा प्रश्न पाठपुराव्यामुळे मार्गी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सुमारे १५० वाहतूक वॉर्डनना चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसून, संबंधित ठेकेदाराचे कंत्राट रद्द करून तातडीने वेतन देण्याची मागणी केली. शहरातील वाढत्या अतिक्रमणांवरूनही त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत संबंधित सहायक आयुक्तांवर कारवाईची मागणी केली.


