भाजप नगरसेविका नम्रता कोळी यांची मागणी
नवी मुंबई महापालिकेने ३० वर्षांमध्ये मालमत्ता कर वाढविलेले नाहीत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्यावा, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी केली आहे. नवी मुंबईने मालमत्ता कराचे उत्पन्न स्थिर असताना, आणखी उत्पन्नाचे कोणते स्त्रोत शोधले, याची माहिती घ्यावी, अशी सूचना नम्रता कोळी यांनी केली.
ठाणे महापालिकेच्या महासभेत मालमत्ता करवाढीचा विषय गोंधळात मंजूर करण्यात आला. या विषयावर बोलण्याची संधीही अनेक नगरसेवकांना देण्यात आली नाही, याबद्दल नम्रता कोळी यांनी नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींना बोलू न देणे हा नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका नम्रता कोळी यांनी केली.
नवी मुंबईत निवासी मालमत्ता दराचे कर मूल्याच्या ३२.६७ टक्के, तर अनिवासी व औद्योगिक मालमत्तांसाठी ५३.३३ टक्के आकारण्यात येत आहेत. तर ठाणे शहरात सध्या २२ टक्के व अनिवासी मालमत्तांवर १३४ टक्के करआकारणी होत आहे. एवढा मोठा फरक दोन महापालिकांमध्ये आहे,याकडे नम्रता कोळी यांनी लक्ष वेधले.
महापालिकेच्या निवडणुकीला सहा महिने झाली असून, विकासकामांना अजून सुरूवात झालेली नाही. मात्र, विकासकामांआधीच भाडेवाढीचा दणका बसला आहे. निवासी १२ टक्के व अनिवासी २० टक्के वाढ नागरिकांवर अन्यायकारक आहे.
ठाणे शहरात विशेषतः प्रभाग क्र. २२ व नौपाडा परिसरात जुन्या इमारतींचा पुनर्विकास होत आहे. जुन्या रहिवाशांना वाढीव मालमत्ता कर भरावा लागणार आहे.


