विविध महाविद्यालयात केले मनवीसे युनिटचे उदघाटन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे विद्यार्थी सेनेच्या सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अमित ठाकरे यांनी रस्त्यावरील खड्यावरून सरकारला जाब विचारा असे म्हणत सत्ताधार्याना धारेवर घेतले. यावेळी मनसे नेते राजू पाटील यांच्यासह मनसे आणि मनविसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दौऱ्या दरम्यान अमित ठाकरे यांनी डोंबिवली शहरातील प्रगती कॉलेज, पेंढरकर कॉलेज कल्याण मधील साकेत कॉलेज आणि बिर्ला कॉलेज येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कॉलेज मध्ये मनसेच्या विद्यार्थी सेनेने आपले युनिट स्थापन केले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, रोजगाराच्या संधी, विद्यार्थी हिताचे विविध प्रश्न तसेच युवकांच्या अपेक्षा आणि भूमिका याबाबत अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संघटनेशी जोडणे आणि त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या दौऱ्यामागील प्रमुख उद्देश आहे.
यावेळी कल्याण डोंबिवलीतील रस्ते आणि इतर समस्यांबाबत अमित ठाकरे यांनी सरकारवर चांगलीच टीका केली. उपमुख्यमंत्री यांचा मुलगा खासदार आहेत ना. आमदार कुठे आहेत डोंबिवली मध्ये येण्यासाठी दोन तास लागले रस्त्यांच्या खड्यांमुळे अनेक लोकांचा मृत्यू होतो. वर्षानुवर्ष हे शहर घाण होत चालले आहेत. ट्रेनला दरवाजे नाहीत लोकं पडून मरतात. या गोष्टीकडे बघणार कोण. आमदार तुमचे खासदार तुमचे. कल्याण डोंबिवली मध्ये दोन दिवसानंतर पाणी मिळते.
एका रस्त्यावरती डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण पेवर ब्लॉक कसे शक्य आहे. त्याच ठेकेदाराला कसं काय कॉन्ट्रॅक्ट मिळतं. आमची सत्ता नाशिक मध्ये पाच वर्ष होती तेव्हा एकही खड्डा नव्हता. कल्याण डोंबिवली मध्ये एक हाती सत्ता द्या. तुम्हाला दाखवतो रस्ते कसे बनतात. कॉलेजच्या तरुणींना कॉलेज बाहेर गर्दुल्याकडून त्रास होत असून हे प्रश्न एका दोन दिवसात सोडवले पाहिजेत. पोलिसांनी काही केलं नाही तर मुंबई या ठिकाणी आम्ही केलं तसं मनसैनिकांची टीम कॉलेजच्या बाहेर उभे राहणार.


