वाहतूक नियमभंगावर आता नागरिकांचा ‘वॉच’

ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध होणार

ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत करण्यासाठी आता ठाणे वाहतूक पोलिसांनी सोशल मीडियाची कास धरली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांना थेट व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तक्रार नोंदविता येणार असून, तक्रारीसोबत पाठविलेल्या छायाचित्रांच्या आधारे पोलिसांकडून तत्काळ पडताळणी करून कारवाई केली जाणार आहे.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार ठाणे शहर वाहतूक शाखेने हा उपक्रम सुरू केला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील विविध वाहतूक उपविभागांसाठी १८ अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

नागरिकांच्या परिसरात राँग साईड वाहन चालविणे, ट्रिपल सीट, फॅन्सी अथवा नियमबाह्य नंबर प्लेट, टिंटेड ग्लास, नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करणे, डबल पार्किंग किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण करणे यांसह अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन आढळल्यास त्याची माहिती संबंधित वाहतूक उपविभागाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठविता येणार आहे.

प्राप्त तक्रारीतील छायाचित्रे व उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधित वाहतूक अधिकारी किंवा अंमलदारांकडून पडताळणी करण्यात येईल. नियमभंग झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित वाहनावर ई चलान कारवाई करण्यात येणार आहे. तसेच करण्यात आलेल्या कारवाईची माहिती तक्रारदार नागरिकाला देणेही अधिक सुलभ होणार आहे.

तीन फोटो पाठवा, थेट कारवाईचा बडगा मोबाईलद्वारे तक्रार करताना नागरिकांनी शक्यतो किमान तीन सुस्पष्ट छायाचित्रे पाठवावीत. विशेषतः वाहनाचा नोंदणी क्रमांक स्पष्ट दिसेल, अशा पद्धतीने फोटो काढण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तक्रारीसोबत वाहन क्रमांक, घटनास्थळ आणि नेमका वाहतूक नियमभंग याची माहिती देणेही आवश्यक आहे.

Scroll to Top