जव्हार फाट्यावरील पूल बनला अपघाताचा केंद्रबिंदू

जव्हार फाट्यावरील पूल बनला अपघाताचा केंद्रबिंदू

प्रवाशांचा जीव धोक्यात; अर्धवट खोदकामामुळे वाहनचालकांची कसरत

येथून ९ किलोमीटर अंतरावर घाट सुरू होताच डावीकडे विहिगाव, खोडाळा, मोखाडा कडे जाणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग म्हणजे प्रसिद्ध जव्हार फाटा. याच ठिकाणी असलेला पुलाखालील रस्ता सध्या वाहनधारकांसाठी प्रचंड धोकादायक ठरत आहे. सुमारे दीड महिन्यापूर्वी सुरू करण्यात आलेले खोदकाम संबंधित ठेकेदाराने अर्धवट स्थितीत सोडल्याने या ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. इथे दगड, चिखल आणि पाणी साचले आहे. त्यामुळे या मार्गावर दररोज लहान-मोठे अपघात घडत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य निचरा व्यवस्था नसल्याने खोदलेल्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे खड्ड्यांची खोली वाहनचालकांना लक्षात येत नाही. कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा बॅरिकेड्स, धोक्याचे फलक आणि रिफ्लेक्टर्स लावण्यात आले नसल्याने विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. पाण्यातून मार्ग काढताना दुचाकींचे सायलेन्सर पाण्यात गेल्याने वाहने बंद पडत असल्याच्या तक्रारीही वाहनचालकांनी केल्या आहेत.
दरम्यान, परवा दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खोडाळ्याहून कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा साचलेल्या दगड, चिखल आणि पाण्यामुळे तोल जाऊन अपघात झाला. दुचाकी घसरल्याने चालक किरकोळ जखमी झाला. सुदैवाने वाहनाचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, अशा घटना वारंवार घडत असल्याने या ठिकाणी एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पुलाखालील रस्ता मुंबई-नाशिक महामार्गापासून अवघ्या ५० ते ६० मीटर अंतरावर असून, खोडाळा-मोखाडा परिसरातील नागरिकांसाठी हा महत्त्वाचा जोडरस्ता आहे. या मार्गावरून मुंबई, नाशिक आणि कसारा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. विद्यार्थी, कामगार, व्यापारी तसेच कसारा रेल्वे स्थानकाकडे जाणारे प्रवासीही या मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे अर्धवट खोदकामामुळे निर्माण झालेली परिस्थिती हजारो प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
रात्रीच्या वेळी या ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. एखाद्या निष्पाप प्रवाशाचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन अर्धवट काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. काम पूर्ण होईपर्यंत रस्त्यावर सुरक्षा बॅरिकेड्स, धोक्याचे सूचना फलक आणि रिफ्लेक्टर्स लावावेत. तसेच ठेकेदाराच्या निष्काळजीपणाची चौकशी करून प्रवाशांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करावी, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Scroll to Top