पडघा तालुका झालाच पाहिजे-कृती समितीची महसूलमंत्र्यांशी भेट

पडघा तालुका निर्मितीच्या मागणीसाठी कृती समितीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

पडघा तालुका निर्मितीच्या मागणीसाठी कृती समितीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

भिवंडी पडघा येथे अप्पर तहसील कार्यालयाचे मुख्यालय स्थापन करण्यासह स्वतंत्र पडघा तालुका घोषित करण्याच्या मागणीसाठी पडघा अप्पर तहसील मुख्यालय कृती समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी विविध प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा करून समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार ‘ठाणे जिल्ह्यात अप्पर तहसीलदार कार्यालय, भिवंडी ग्रामीण’ या नवीन कार्यालयाचे मुख्यालय पडघा येथे निश्चित करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी पडघा अप्पर तहसील मुख्यालय कृती समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच भिवंडी तालुक्याचे विभाजन करून पडघा हा नवीन तालुका निर्माण करण्याबाबत माजी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनीही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र दिले आहे. यावेळी या शिष्टमंडळात पडघा अप्पर तहसील मुख्यालय कृती समितीचे अध्यक्ष श्रीकांत गायकर, कार्याध्यक्ष पंडित पाटील, सचिव भगवान सांबरे, सदस्य विकास पाटील, दिलशाद शेख यांचा समावेश होता. पडघा परिसराचा वाढता विस्तार आणि नागरिकांच्या प्रशासकीय गरजा लक्षात घेता, अप्पर तहसील कार्यालयाचे मुख्यालय पडघा येथे असणे आवश्यक असल्याचे समितीने महसूलमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

Scroll to Top