गणेशोत्सवाच्या माध्यमातून भिवंडीत मनपा व प्रशासनाच्या ‘टीमवर्क’ मधून थेट गणेश मंडळ मंडपात प्रभावी लोकसंवाद

'Bappa.org'सह विविध उपक्रमांची माहिती मिळाल्याने भाविक-नागरिकांचे समाधान

‘Bappa.org’सह विविध उपक्रमांची माहिती मिळाल्याने भाविक-नागरिकांचे समाधान

धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांच्या माध्यमातून लोककल्याणकारी शासकीय योजना थेट तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम भिवंडीत राबवण्यात आला. राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांच्या परीक्षणाच्या निमित्ताने, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका व परीक्षा समितीने गणेश मंडपांमध्ये प्रत्यक्ष जाऊन भाविक व नागरिकांशी प्रभावी ‘लोकसंवाद’ साधला. या संयुक्त उपक्रमामुळे प्रशासकीय विभागांमधील उत्तम समन्वय व टीमवर्कचे दर्शन घडले असून, घरबसल्या विविध योजनांची सविस्तर माहिती मिळाल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी मनापासून समाधान व्यक्त केले आहे.
भिवंडी तालुक्यातून राज्यस्तरावर नोंदणी करण्यात आलेल्या प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परीक्षणासाठी परीक्षण समितीने प्रत्यक्ष भेट दिली. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. विक्रम दराडे यांच्या अध्यक्षतेखालील या परीक्षण समितीने कामतघर येथील ‘स्व. पंडीत नाना मित्र मंडळ’ आणि ‘धामणकर नाका मित्र मंडळ’ येथे भेटी दिल्या. या दौऱ्यात शासकीय सदस्य म्हणून बी. एन. एन. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सुरेश अहिरे, अशासकीय सदस्य श्री. कमलेश बोरसे तसेच महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्रीकांत परदेशी हे प्रमुख समन्वयक म्हणून उपस्थित होते. केवळ देखाव्यांचे किंवा मांडणीचे औपचारिक परीक्षण न करता, गणेशोत्सवाचे मूळ उद्दिष्ट असलेल्या ‘जनजागृती आणि लोकसंग्रह’ या तत्त्वाला धरून समितीने उपस्थित नागरिक, तरुण वर्ग आणि भाविकांशी “लोकसंवादा” च्या माध्यमातून थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला. धामणकर नाका मित्र मंडळ येथे उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना उपायुक्त श्री. विक्रम दराडे यांनी शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘Bappa.org’ उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. गणेशोत्सवाचे डिजिटलायझेशन, मंडळांचे व्यवस्थापन आणि पारदर्शकता यासाठी हे व्यासपीठ कसे उपयुक्त ठरते, यावर त्यांनी प्रकाश टाकला. यासोबतच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या ‘रोजगार महाकुंभ’ या उपक्रमाचे महत्त्व समजावून सांगत तरुणांनी यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. समाजातील दुर्लक्षित राहिलेल्या घटकांसाठी, विशेषतः एकल महिलांसाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, तसेच महानगरपालिकेच्या स्थानिक विकास व आरोग्य विषयक योजनांचा लाभ कसा घ्यावा, याचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले.

Scroll to Top