मुरबाड पोलीस वसाहतीत गणेशोत्सव उत्साहात

मुरबाड पोलीस वसाहतीत गणेशोत्सव उत्साहात

मुरबाड पोलीस वसाहतीमध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा जपली जात असून, यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे गणरायाची प्रतिष्ठापना करून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले.
यंदाचा गणेशोत्सव डीवायएसपी अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
या उत्सवासाठी सपोनी सोनवणे, सपोनी महादेव खोमणे, विजय कांबळे, नितीन घाग, रामा शिंदे, एएस आय हिंदुराव, राम काळे, विनायक खेडकर तसेच महिला पोलिस कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. पोलीस वसाहतीमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
गणेशोत्सवाच्या काळात मुरबाड शहरातील विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, पत्रकार तसेच नागरिकांनी पोलीस वसाहतीला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी आयोजित महापूजेत मान्यवरांनी सहभाग घेतला तसेच महापूजेचा प्रसाद स्वीकारला.
पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या कर्तव्याच्या जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच सामाजिक आणि धार्मिक परंपराही जपत असल्याचे या गणेशोत्सवातून दिसून आले. पोलीस वसाहतीतील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सहभागामुळे गणेशोत्सवाला विशेष रंगत आली.
गणपती बाप्पाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला असून, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

Scroll to Top