नेतिवली टेकडीवर ३० हजार वृक्षलागवडीचा शुभारंभ

नेतिवली टेकडीवर ३० हजार वृक्षलागवडीचा शुभारंभ

सेवा संकल्प अभियान आणि ‘मिशन ग्रीन केडीएमसी’ अंतर्गत नेतिवली टेकडी येथे ३० हजार झाडे लावण्याच्या वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि बीपीसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विविध शाळा, महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या वेळी महापौर अॅड. हर्षाली चौधरी यांनी, “वृक्षारोपणाची ही मोहीम हरित पर्यटनासाठी चांगला संदेश आहे. आपले शहर हे आपले घरच असून ते स्वच्छ व सुंदर ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. या उपक्रमासाठी विद्यार्थी आणि नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे,” असे सांगितले.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले की, बीपीसीएलच्या सीएसआर निधीतून या उपक्रमाची सुरुवात झाली असून बीपीसीएलकडून पुढील तीन वर्षे झाडांची देखभाल केली जाणार आहे. तसेच ठिबक सिंचनाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. नेतिवली टेकडी हिरवीगार झाल्यास येथे ऑक्सिजन पार्क विकसित करण्यास मदत होईल. प्रत्येक विद्यार्थ्याने दरवर्षी एक झाड लावावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला आमदार सुलभा गायकवाड, आमदार राजेश मोरे, महापौर ॲड. हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी, शिक्षण समिती सभापती अभिजीत थरवळ, महिला व बालकल्याण समिती सभापती सारिका जाधव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, बीपीसीएलचे अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
याच कार्यक्रमात ‘शाश्वत कचरा वर्गीकरण’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. घराच्या पातळीवरच ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. कागद व प्लास्टिकसाठी प्रतिकिलो दोन रुपये, ई-कचऱ्यासाठी प्रतिकिलो आठ रुपये तसेच इतर भंगारासाठी मोबदला देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे कचऱ्याचे पुनर्वापरासाठी वर्गीकरण होऊन डम्पिंग ग्राउंडवरील ताण कमी होण्यास मदत होईल. नागरिकांना कचरा वर्गीकरणासाठी थेट आर्थिक मोबदला देणारा हा उपक्रम इतर शहरांसाठीही आदर्श ठरू शकतो, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली. कार्यक्रमात उपस्थितांना स्वच्छतेची शपथही देण्यात आली.

Scroll to Top