कर्जत तालुक्यातील प्रस्तावित ‘शिलार’ आणि ‘पोशीर’ धरण प्रकल्प रद्द करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
आमदार महेंद्र थोरवे यांनी अलिबाग येथे जाऊन रायगड जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. कर्जत तालुक्यातील प्रस्तावित शिलार आणि पोशीर धरण प्रकल्पांना स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. या प्रकल्पांमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे, शेती व्यवसाय तसेच अनेक कुटुंबांची उपजीविका धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरातील शेतकरी आणि विविध संघटनांनी आमदार थोरवे यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या होत्या. ग्रामस्थांच्या या निवेदनाची दखल घेत आमदार थोरवे यांनी दोन्ही धरण प्रकल्प रद्द करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिलार आणि पोशीर धरण प्रकल्पांच्या प्रश्नावर स्थानिक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आमदार म्हणून आघाडीवर राहून पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पोशीर धरणाच्या विरोधात कार्य करणाऱ्या ‘बोरगाव शेतकरी मंडळ’ तसेच शिलार धरणाच्या विरोधात कार्यरत ‘शिलार धरण जनांदोलन समिती ‘ला त्यांनी पूर्ण सहकार्य व पाठिंब्याचे आश्वासन दिले आहे.
शिलार-पोशीर धरण विरोधी आंदोलनाला आमदार महेंद्र थोरवेंचा पाठिंबा



