नेरळ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

नेरळ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

बेपत्ता बालकाची अवघ्या २ तासांत सुखरूप सुटका

नेरळ पोलीस स्टेशन हद्दीतील खांडा-नेरळ गावातून बेपत्ता झालेला ११ वर्षाचा मुलगा नेरळ पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या काही तासांत सुखरूप पालकांच्या ताब्यात मिळाला आहे. वडिलांच्या रोषाला सामोरे जावे लागेल या भीतीपोटी हा बालक घराबाहेर थांबला होता. मिळालेल्या माहितीनुसार, नेरळ जवळील खांडा येथील रहिवासी मेहरुनमिसा उस्मान शेख यांनी रात्री ८:५७ वाजता ‘डायल ११२’ वर फोन करून माहिती दिली की, त्यांचा ११ वर्षाचा मुलगा मोहम्मद इमरान संध्याकाळी ५:३० वाजल्यापासून बेपत्ता आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नेरळ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार केकाण, आशु बेंद्रे, कनके, कनकुटे, डाखोरे आणि महाकाल यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत शोधकार्यासाठी तीन वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या. पहिली टीम रेल्वे ट्रॅक परिसर त्यानंतर दुसरी टीम बाजारपेठ परिसर व तिसरी टीम घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अशाप्रकारे या तीन टीम तयार करण्यात आल्या होत्या.
नेरळ पोलिसांनी कसून चौकशी व शोधमोहीम राबवली असता, सदर मुलगा त्याच्या जुन्या घराच्या बाजूला असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने तेथे जाऊन खात्री केली असता, रात्री ९:३० वाजता तो कुणीकडेही न जाता सुरक्षित मिळून आला. चौकशीत समोर आले की, काही कारणावरून वडील रागवतील या भीतीपोटी तो जुन्या घराच्या जवळ येऊन थांबला होता. पोलिसांनी घाबरलेल्या बालकाची समजूत काढून त्याला सुखरूप त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले. नेरळ पोलिसांच्या या वेगवान आणि संवेदनशील कारवाईमुळे एका चिमुकल्याचा जीव वाचला असून पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. तसेच परिसरातून नेरळ पोलिसांचे कौतुक होत आहेत.

Scroll to Top